Tur Kharedi Kendra | अहिल्यानगर जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी ९ केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी व प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या खरेदी प्रक्रियेसाठी पणन महासंघाने हे केंद्र मंजूर केले आहेत. शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीवर तूर विक्रीचा लाभ मिळवून देण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आलेला आहे. (Tur Kharedi Kendra)
जिल्हा पणन अधिकारी बी. आर. पाटील यांनी यासंबंधी माहिती दिली. १३ फेब्रुवारीपासून २०२४-२५ हंगामासाठी तूर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सन २०२४-२५ साठी तूर पिकाचा हमीभाव ७ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. ९ केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे आणि प्रत्यक्ष खरेदीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
शेवगाव तालुक्यात सुखायू फार्मर प्रोड्युसर कंपनी (बोधेगाव), पाथर्डी तालुक्यात जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था (पाथर्डी), श्रीगोंदा तालुक्यात शिवदत्त फार्मर प्रोड्युसर कंपनी (घारगाव), रिअल ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी (घुटेवाडी) आणि जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी (मांडवगण), राहुरी तालुक्यात राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ (राहुरी), पारनेर तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती (पारनेर), कोपरगाव तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती (कोपरगाव) आणि जामखेड तालुक्यात चैतन्य कानिफनाथ फळ प्रक्रिया सहकारी संस्था (खर्डा उपबाजार समिती) याठिकाणी नोंदणी सुरू केली आहे.
नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन केली जात आहे. शेतकऱ्यांनी आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, चालू वर्षाचा ८-अ व ७/१२ उतारा, तूर पिकाची नोंद असलेला ऑनलाइन पीकपेरा आणि मोबाइल क्रमांकाची माहिती द्यावी लागेल. तसेच, शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाचा माल केंद्रावर आणावा, अशी सूचना पाटील यांनी दिली.
नाफेड किंवा एनसीसीएफच्या गुणवत्तेनुसार शेतमालाची तपासणी केली जाईल. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार एसएमएसद्वारे खरेदीसाठी आमंत्रित केले जाईल. जिल्ह्यात यंदा तुरीचे क्षेत्र ५२ हजार हेक्टरवर गेले असून, पावसामुळे या क्षेत्रात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होती, जी आता पूर्ण केली गेली आहे.
हेही वाचा:
• शेतकऱ्यांनो तुम्हाला पीव्हीसी पाईप योजनेचा मेसेज आला का? 7 दिवसांत पूर्ण करा ‘ही’ प्रक्रिया
• कर्जत-जामखेड तालुक्याला ‘जलदूत’ अॅपच्या मदतीने उन्हाळ्यात टँकरचे नियोजन