पुणे, १५ जून २०२४: पुणे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत यंदाच्या मोसमात सुमारे १२०० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचा भौतिक लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. या योजनेतून आंबा, संत्रा, कागदी लिंबू, चिकू, सीताफळ, पेरू, डाळिंब, आवळा, चिंच, बोर, जांभूळ, कवठ, फणस, कोकम, ड्रॅगनफ्रुट, अव्हॅकेडो, केळी, तसेच फुलपिकांमध्ये निशिगंध, मोगरा, गुलाब, सोनचाफा यांच्यासोबतच फलोत्पादन पिकांव्यतिरिक्त बांबू, शेवगा, साग, शिंदी, औषधी वनस्पती या पिकांचीही लागवड करता येणार आहे.
कृषी आयुक्तालयाने हे लक्ष्य निश्चित केले आहे. या योजनेतून खड्डे खोदणे, कलमे-रोपे लागवड, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे यासारख्या शासन अनुदानित कामांवर १०० टक्के अनुदान मिळेल. हेक्टरी कमाल अनुदान मर्यादेनुसार रक्कम लाभार्थ्यांना ३ वर्षांच्या कालावधीत पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० आणि शेवटच्या वर्षी २० टक्के दिला जाईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जुलै २०२४ अखेरपर्यंत संबंधित ग्रामपंचायत, गावच्या कृषी सहायकाकडे संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
भाऊसाहेब फुंडकर योजनेसाठी दोन कोटी १० लाख
जिल्ह्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यासाठी दोन कोटी १० लाख ७४ हजार रुपयांचा आर्थिक लक्षांक देण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांसाठी एक कोटी ९४ लाख, तर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांसाठी १५ लाख ३३ हजार आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी ६१ हजार रुपयांचा आर्थिक लक्षांक कृषी आयुक्तालयाने दिला आहे.
या योजनेतून आंबा, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिकू, सीताफळ, पेरू, आवळा, चिंच, जांभूळ, फणस या फळपिकांचे किमान हेक्टर, तर कमाल ६ हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ मिळू शकेल. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाडीबीटी प्रणालीवर आलेल्या अर्जानुसार सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.