Rohit Pawar Meet Ram Shinde: भाजप नेते राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राम शिंदेंना भेट दिली आणि त्यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
रोहित पवार यांची पोस्ट
या भेटीबद्दल रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे भावना व्यक्त केल्या. “विधान परिषदेच्या सभापती म्हणून निवड झालेल्या प्रा. राम शिंदे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. स्व. ना. स. फरांदे साहेबांनंतर हा सन्मान मिळवणारे ते अहिल्यानगर जिल्ह्यातील दुसरे नेते आहेत. ही नक्कीच गौरवाची बाब आहे,” असे त्यांनी नमूद केले.
राम शिंदेंची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड
विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपकडून राम शिंदेंचे नाव प्रस्तावित करण्यात आले होते. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांचा विरोधक उमेदवार जाहीर झाला नाही, परिणामी राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. मागील अडीच वर्षांपासून हे पद रिक्त होते.
नीलम गोऱ्हेंची नाराजी
राम शिंदेंच्या निवडीनंतर शिवसेनेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना यापूर्वी विधान परिषदेच्या सभापतीपदाचे आश्वासन दिले गेले होते, मात्र भाजपने राम शिंदेंना संधी दिल्याने नीलम गोऱ्हेंच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.
कर्जत-जामखेडमधील राजकीय संघर्ष
2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी राम शिंदेंचा पराभव केला होता. त्यानंतर राम शिंदेंना विधान परिषदेत संधी मिळाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राम शिंदेंना रोहित पवारांकडून पराभव स्वीकारावा लागला, मात्र विधान परिषदेच्या सर्वोच्च पदावर पोचून त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवली आहे.
राजकीय सभ्यता आणि आदर्श घालून देणारी भेट
राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातील राजकीय मतभेद असूनही, पवार यांनी दिलेल्या शुभेच्छा हे राजकीय सभ्यतेचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. दोन्ही नेत्यांच्या या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात सकारात्मक संदेश दिला आहे.
कर्जत-जामखेड च्या बातम्या साठी आजच जॉईन करा व्हाट्सअँप ग्रुप..