Jamakhed | जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीने ६ फेब्रुवारी २०२५ रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन (State Level Marathi Literature Conference) आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे आयोजन कवीवर्य आ.य.पवार यांच्या संकल्पनेतून केले जात आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक कवी मा. विजयकुमार मिठे यांनी स्वीकारले आहे. हा मराठी साहित्य प्रतिष्ठानचा तिसरा राज्यस्तरीय संमेलन आहे. संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा.ना.प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या हस्ते होईल, तर यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य मा. प्रकाश होळकर आणि डॉ. राजेश गायकवाड प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या साहित्य संमेलनात विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता संमेलनाध्यक्ष मा. विजयकुमार मिठे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन आणि ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. यानंतर “मराठी भाषा व आजची सद्यस्थिती” या विषयावर परिसंवाद आयोजित केला जाईल. या परिसंवादात डॉ. विजय जाधव, डॉ. किसन माने आणि डॉ. सुधाकर शेलार हे सहभागी होणार असून डॉ. फुला बागुल परिसंवादाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. परिसंवादाचे प्रमुख अतिथी दै. लोकमतचे संपादक मा. सुधीर लंके असतील.
दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध चित्रपट गीतकार मा. बाबासाहेब सौदागर यांची प्रकट मुलाखत होईल. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात साहित्य पुरस्कार वितरण सत्र होईल, ज्यामध्ये छत्रपती राजे संभाजी साहित्य पुरस्कार वितरित केले जातील. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.
या वर्षीपासून कवीवर्य आ.य. पवार सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह साहित्य पुरस्कार “मृगपक्षी” या काव्यसंग्रहासाठी मा. बाबासाहेब सौदागर यांना दिला जाईल. संमेलनाच्या शेवटी कवी शंकर वाडेवाले यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल, ज्यामध्ये अनेक मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांना स्नेह भोजनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. सर्व साहित्यप्रेमी, लेखक, कवी आणि पत्रकारांनी मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा:
• दुसरीत शिकणाऱ्या जामखेडच्या सरल बोराटेचे हस्ताक्षर मोत्याहूनही सुंदर; सोशल मीडियावर लाइक्सचा पाऊस
• मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई? संपत्ती जप्तीसाठी एसआयटीच्या हालचाली सुरू