Jamkhed News | जामखेड : जामखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसल्याच्या अफवा पसरत आहेत. या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत उपविभागीय वनाधिकारी मोहन शेळके यांनी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
जामखेड तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून साकत घाट, मोहा, भुतवडा घोडेगाव, सौताडा या परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळत आहे. यावेळी काही जणांनी बिबट्याचे व्हिडिओही काढले होते. परंतु, या व्हिडिओची सत्यता तपासली असता ती अफवा असल्याचे समोर आले.
दरम्यान, जामखेड शहरात बिबट्या दिसल्याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक सकाळी फिरण्याचे टाळत आहेत. तसेच मुलेही शाळेत जाण्यास घाबरत आहेत. अफवा पसरल्यामुळे वन विभाग व पोलिसांनाही मोठी तारण झाली आहे.
याबाबत उपविभागीय वनाधिकारी मोहन शेळके यांनी सांगितले की, अफवा पसरवून जनतेत घबराट निर्माण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शेळके यांनी केले आहे.