Jamkhed News | जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे नियोजित असलेला एक बालविवाह ‘उडान’ बालविवाह प्रतिबंधक प्रकल्प, जामखेड पोलीस आणि अरणगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यशस्वीरीत्या थांबवण्यात आला. अरणगावातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्यात आली. (Jamkhed News)
या संभाव्य बालविवाहाची माहिती ‘उडान’ हेल्पलाईनवर आलेल्या एका गोपनीय फोनद्वारे प्रकल्प समन्वयक प्रवीण कदम आणि योगेश अब्दुले यांना मिळाली. माहिती मिळताच बालहक्क कार्यकर्ते योगेश अब्दुले यांनी तात्काळ ही संवेदनशील माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली.
‘उडान’ टीमने सर्वप्रथम जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आणि ग्रामविकास अधिकारी विनोद खुरुंगळे यांच्याशी संपर्क साधून मिळालेल्या माहितीची पडताळणी केली. माहितीची खात्री पटल्यानंतर, योगेश अब्दुले, सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कदम, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देवढे आणि ग्रामविकास अधिकारी विनोद खुरुंगळे यांनी मुलीच्या पालकांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान, त्यांनी पालकांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील तरतुदींची सविस्तर माहिती दिली. बालविवाह घडवून आणल्यास दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरी किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले.
केवळ कायद्यातील तरतुदीच नव्हे, तर बालविवाहामुळे मुलींच्या आयुष्यावर होणारे गंभीर दुष्परिणामही पालकांना समजावून सांगण्यात आले. बालविवाहामुळे मुलींचे बालपण हिरावले जाते, त्यांच्यावर मानसिक ताण येतो, आत्मविश्वास कमी होतो, आणि शैक्षणिक संधींची दारे बंद होतात. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचेही पथकाने निदर्शनास आणून दिले.
‘उडान’ प्रकल्प, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाच्या या तत्पर आणि समन्वित कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित झाले आहे. बालविवाहासारख्या सामाजिक दुष्प्रथा रोखण्यासाठी अशा प्रकारच्या प्रयत्नांची गरज अधोरेखित होते. नागरिकांनीही बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ हेल्पलाईनवर किंवा पोलिसांना कळवून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.