Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) मध्ये काल एक महत्त्वपूर्ण अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान नेते मानले जातात, त्यामुळे त्यांना ही महत्त्वाची संधी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
जयंत पाटील गेल्या अनेक दिवसांपासून प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास इच्छुक होते. पक्षाच्या वर्धापन दिनी जाहीर भाषणात त्यांनी स्वतःच ‘मला प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करून नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी,’ अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेनुसारच, कालच्या बैठकीत त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि त्याला एकमताने मंजुरी मिळाली.
रोहित पवारांकडे नवी जबाबदारी?
प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाल्यानंतर, आता पक्षाच्या मुख्य सचिवपदीही नवी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात सध्या या पदासाठी युवा आमदार रोहित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवार यांच्यावर पक्षाच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.
या संदर्भात राज्याच्या राजकारणात एक चर्चा अशीही सुरू आहे की, जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात पक्षांतर्गत शीतयुद्ध होते. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत रोहित पवारांना मोठी जबाबदारी मिळाली नव्हती, असे म्हटले जाते. आता जयंत पाटील यांनी पद सोडल्यामुळे रोहित पवारांना नवी संधी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व घडामोडींवर आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन,” असे त्यांनी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले, “सर्व मोठे नेते अनेक वर्षे त्यांनी सरकार चालवली आहेत, पार्टी चालवलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात जो बदल होईल तो पार्टीला आणि पार्टीमध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना स्वीकारावा लागेल.”
रोहित पवारांच्या महत्त्वाकांक्षेला लगाम?
एकीकडे रोहित पवार पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही देत असले तरी, दुसरीकडे ते देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी आग्रही असल्याचे यापूर्वी दिसून आले होते. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे रोहित पवार यांना पक्षाचा नवा आणि तरुण चेहरा म्हणून पाहिले जात होते. अशा परिस्थितीत, शरद पवारांनी ‘भाकरी फिरवत’ शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. आता रोहित पवारांना मुख्य सचिवपदाची धुरा मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एकूणच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात संघटनात्मक स्तरावर मोठे बदल घडत असून, याचे दूरगामी परिणाम काय होतात, हे येणारा काळच सांगेल.
हेही वाचा: