Jamkhed Crime | धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून संतप्त झालेल्या आठ जणांच्या टोळक्याने एका १८ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड, काठ्या आणि धारदार हत्यारांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, तो मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपींनी तरुणाला मृत समजून रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Jamkhed Crime) भूम तालुक्यातील पाथरुड येथील माऊली बाबासाहेब गिरी (वय १८) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
काय घडले नेमके?
माऊली गिरी याला ३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी जबर मारहाण केली. माऊलीच्या वडिलांना याबाबत फोन आल्यानंतर त्यांनी तातडीने माऊलीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन बंद येत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना माऊलीचा शोध घेण्यास सांगितले.
विवस्त्र करून रस्त्यावर फेकले
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळेवाडी येथील पोलीस पाटलांनी माऊलीच्या वडिलांना फोन करून त्यांच्या मुलाला जबर मारहाण करून विवस्त्र अवस्थेत पश्चिम पांढरेवाडी ते कोकणे वस्ती रस्त्यालगत फेकून दिल्याचे सांगितले. यानंतर माऊलीला तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या माऊली मृत्यूशी झुंज देत आहे.
तीन आरोपी ताब्यात
या घटनेनंतर माऊलीचे वडील बाबासाहेब गिरी यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा:
• जामखेड बसस्थानकाचे काम तीन वर्षांपासून रेंगाळले; प्रवाशांची होऊ लागली गैरसोय
• जामखेडकरांसाठी गुडन्यूज! जामखेडमध्ये रस्त्याचे काम सुरू, सामजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश