Jamkhed Encroachment | जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळणार असून, येत्या आठ दिवसांत शहरातील पक्क्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तहसील कार्यालयात बुधवारी आयोजित बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद, पोलिस प्रशासन आणि नागरिक यांची उपस्थिती होती. (Jamkhed Encroachment)
या बैठकीत रस्त्याच्या बाजूला झालेल्या अतिक्रमणांची दखल घेण्यात आली. संबंधित विभागांच्या संयुक्त प्रयत्नाने अतिक्रमण काढण्यासाठी वेगाने कार्यवाही केली जाईल. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, भूमिअभिलेख व पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय साधून ही कारवाई होणार आहे.
तहसीलदार गणेश माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राष्ट्रीय महामार्गाच्या अतिक्रमण हटवण्याच्या कामासाठी ठेकेदाराला सूचना दिल्या होत्या. मात्र ठेकेदाराने त्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच जामखेड शहरातील बीड कॉर्नर ते समर्थ हॉस्पिटल रोडचे काम सुरू करण्यात आले आहे. विंचरणा नदीच्या पुलावर एका बाजूच्या कामाला सुरूवात झाली आहे, तर हापटेवाडी ते सौताडा घाट पायथ्यापर्यंत रस्ता मोकळा करण्याचे कामही सुरू आहे.
तसेच, शहरातील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंत पक्क्या अतिक्रमणांवर आठ दिवसांत कारवाई केली जाईल. 25 मार्च रोजी संबंधित विभागांमार्फत मोजमाप करून अतिक्रमण हटवले जातील. नगरपरिषद मुख्याधिकारी अजय साळवे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मोजणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भुयारी गटार आणि पाणीपुरवठा योजना सुद्धा तातडीने सुरू केली जाईल.
रस्त्यावरील कामामुळे अनेक अपघात झाल्यामुळे, त्यावर विचार करत तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले की, दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याच संदर्भात पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्पष्ट केले की, अतिक्रमण काढण्याच्या कामात अडथळा आणल्यास संबंधितावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात येतील. यामुळे जामखेड शहरात अतिक्रमणांवर कठोर कारवाई सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा:
• कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत सुधारणा