Ram Shinde | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे. बुधवारी (ता. १६) विधानभवनाच्या गॅलरीत आपल्या लाडक्या लेकाचं काम पाहण्यासाठी एक आई थेट विधानभवनात पोहोचली. इरकलचं नऊवारी लुगडं, मराठमोळी चोळी, नाकावर नथ आणि डोक्यावर पदर अशा पारंपरिक वेशभूषेत असलेल्या या मातेच्या डोळ्यात तेज होतं, चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं आणि मनात एक अतूट अभिमान होता. (Ram Shinde)
या मातोश्री दुसऱ्या-तिसऱ्या कुणी नसून, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या आई, भामाबाई शंकर शिंदे होत्या. विधानभवनाच्या सभागृहात आपल्या मुलाला (सभापती राम शिंदे) उच्च पदावर बसून कामकाज करताना पाहण्याचा आनंद त्यांनी डोळे भरून अनुभवला. भामाबाई डोक्यावर पदर घेऊन विधानभवनात पोहोचताच, विधानभवन परिसरातील माध्यमांचे कॅमेरे आपोआप त्यांच्याकडे वळले.
राम शिंदे यांच्या मातोश्री असल्याचे समजताच पत्रकारांनी त्यांना घेरले. आपल्या मुलाप्रमाणेच, भामाबाईंनीही पत्रकारांच्या प्रश्नांना अत्यंत सहजपणे उत्तरे दिली. अनेक कॅमेऱ्यांचे लक्ष त्यांच्यावरच खिळले होते आणि त्यांनी पत्रकारांना हवी तशी पोझही दिली. त्यांच्या साधेपणाने आणि आत्मविश्वासाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
विशेष म्हणजे, राम शिंदे यांचे राजकीय विरोधक असलेले आमदार रोहित पवार यांनीही भामाबाईंच्या या कृतीचे कौतुक केले. रोहित पवार यांनी याबाबत आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, “राम शिंदे हे माझे राजकीय विरोधक आहेत, पण उच्च पदावर बसलेल्या आपल्या मुलाला भेटायला त्यांच्या मातोश्री विधिमंडळात आल्या. तेव्हा त्यांचा ऊर नक्कीच अभिमानाने भरून आला असेल.” आपली संस्कृती आणि परंपरा जपणारी ही जुनी पिढी आजच्या नवीन पिढीसाठी नक्कीच आदर्शवत आहे, असे म्हणत आमदार पवारांनी या मातेला दंडवत घातला आणि हा व्हिडिओ शेअर केला.
यापूर्वी, नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राम शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. त्या दोन्ही वेळी त्यांच्या मातोश्री भामाबाई त्यांच्यासोबत होत्या. पंतप्रधान मोदींनीही त्यावेळी भामाबाईंसोबत दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. भामाबाई शिंदे यांचा विधानभवनातील हा प्रवेश केवळ एका आईचे आपल्या मुलाबद्दलचे प्रेम दर्शवत नाही, तर महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि पारंपरिक मूल्यांचेही ते प्रतीक ठरले आहे.
हेही वाचा: