Ahilyanagar | पैशाच्या मागणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णा श्रीनाथ काळे (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी केडगाव उपनगरातील शिवाजीनगर येथे घडली. कृष्णाने रेल्वेखाली आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Ahilyanagar Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णाचा ट्रॅक्टर त्याचा मित्र शरद रामचंद्र जाधव याने भाड्याने घेतला होता. कृष्णाला त्याच्या साखरपुड्यासाठी पैशाची गरज असल्याने त्याने शरदकडून ३० हजार रुपये उसने घेतले होते. काही दिवसांपासून कृष्णा शरदला ट्रॅक्टर परत मागत होता. मात्र, शरद त्याला टाळाटाळ करत होता. ३ फेब्रुवारी रोजी कृष्णा झिक्री गावी गेला असता त्याला ट्रॅक्टर मिळाला नाही. त्यावेळी शरदने त्याला शिवीगाळ करत दमदाटी केली आणि ५० हजार रुपये देण्याची मागणी केली. पैसे दिले तरच ट्रॅक्टर परत देईल, असे त्याने कृष्णाला सांगितले.
४ फेब्रुवारी रोजी कृष्णाने शरदला ३० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली, पण शरदने पूर्ण ५० हजार रुपयांची मागणी केली. शरदसोबत असलेल्या एका व्यक्तीने कृष्णाला ‘तुझ्याकडून पैसे देणे होत नसेल तर तू जीव दे’ असे बोलले. या मानसिक त्रासाला कंटाळून कृष्णाने ५ फेब्रुवारी रोजी रेल्वेखाली आत्महत्या केली.
कृष्णाच्या आत्महत्येला शरद जाधव आणि त्याच्यासोबत असलेला अनोळखी व्यक्ती जबाबदार असल्याचा आरोप कृष्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा:
• शेतकऱ्यांना सरकार देणारं पाईपलाइन; जाणून घ्या पाइपलाइन अनुदान योजना अन् अर्ज कसा करावा?
• साहित्यिकांनी केवळ नव्या विचारांचा प्रसार नये, तर समाज प्रबोधनावर भर द्यावा – प्रा. राम शिंदे