Maharashtra Kesari | महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील वाडिया पार्क येथे संपन्न झाली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर, आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कर्जत जामखेड येथे पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
मात्र, या स्पर्धेवरून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर टीका केली आहे. शिंदेंनी रोहित पवारांना टोला मारताना म्हटले की, जसे साहित्य संमेलनानंतर विद्रोही साहित्य संमेलन घेतले जातात, तसेच आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नावावर विद्रोही स्पर्धा घेतल्या जात आहेत. यामध्ये तेच लोक सहभागी आहेत, जे निवडणुकीत “नुरा कुस्ती” खेळत होते. त्यांच्या तोंडून आता खऱ्या कुस्तीची भाषा शोभत नाही, अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे.
वाडिया पार्कमध्ये आयोजित झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन चांगल्या प्रकारे केल्याचे शिंदेंनी सांगितले. त्यांच्या मते, विद्रोही कुस्ती स्पर्धेचा गोडवा घेणाऱ्यांनी निवडणुकीत आपलेच खेळ खेळले होते, त्यामुळे ते आता खऱ्या कुस्तीची भाषा करणे योग्य नाही.
गेल्या काही वर्षांपासून कुस्ती क्षेत्रामध्ये वादाची स्थिती आहे. दोन प्रमुख संघटनांमध्ये झालेल्या वादामुळे, दोन वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांच्यात हा वाद सुरु आहे, जो न्यायालयापर्यंत पोहचला आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी कर्जत जामखेड येथे 26 ते 30 मार्च दरम्यान 66 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची माहिती दिली. यामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: