Jamkhed Crime | जामखेड शहरातील साकत फाटा येथे एका महिलेच्या घरात घुसून दरोडा टाकणाऱ्या सराईत चोरट्यांची टोळी पोलिसांनी अखेर पकडली आहे. या टोळीने घरात शस्त्राचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले होते. पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत सुमारे साडेसतरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. (Jamkhed Crime)
फिर्यादी प्रतीक्षा शंकर रोकडे यांचे घर २६ फेब्रुवारी रोजी रात्री २ वाजता टोळीने लक्ष्य केले. आरोपींमध्ये एका महिलेसह ७ ते ८ चोरट्यांचा समावेश होता. आरोपींनी ‘दिदी दरवाजा खोलो’ असा आवाज देऊन प्रतीक्षाच्या घराचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच, आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवून घरात प्रवेश केला आणि प्रतीक्षा शंकर रोकडे यांच्यासह त्यांच्या आई व बहिणीचे सोन्याचे दागिने व घरातील रोख रक्कम चोरून नेली.
घटनेनंतर जामखेड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक दिनेश आहेर यांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे, आरोपी बाबा आबा काळे आणि त्याच्या साथीदारांनी दरोडा घालण्याचा प्रयत्न पुन्हा करणार असल्याचे समजले. पोलिसांनी जामखेड-खर्डा रोडवरील मारूती मंदिराजवळ सापळा लावला आणि आरोपींना ताब्यात घेतले.
सापळ्याच्या वेळी आरोपींनी गाडी सोडून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. आरोपींकडून इरटिगा कार, स्कॉर्पिओ, चार मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्याची किंमत सुमारे १३ लाख ४५ हजार रुपये आहे. तसेच, सोन्याचे दागिने धाराशिव येथील सोनाराला विकल्याची कबुली आरोपींनी दिली.
आरोपींमध्ये अनिल मच्छिंद्र पवार (वय ३२), सुनिल धनाजी पवार (वय १९), संतोष शिवाजी पवार (वय २२), रमेश मत्या काळे (वय ४७), बाबा आबा काळे (वय २५), अमोल सर्जेराव काळे (वय २३), शिव अप्पा पवार (वय २४) यांचा समावेश आहे. फरार आरोपींची नावे कुक्या बादल काळे, सचिन काळे आणि शालन अनिल पवार अशी आहेत. दरोड्याच्या या गंभीर घटनेत पोलिसांनी चोख तपास करून आरोपींना गजाआड केले, त्यामुळे जामखेडमधील नागरिकांमध्ये एक सुरक्षितता वाटते आहे.
हेही वाचा:
• मोठी बातमी! राम शिंदेंनी रोहित पवारांची आमदारकी आणली अडचणीत; न्यायालयाची नोटीस जारी
• मार्च महिन्यात ‘या’ राशींना मिळणारं नशिबाची साथ! सर्व आर्थिक मार्ग होणारं खुले, वाचा मासिक राशिफल