MPSC Exam | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अखेर राज्यसेवा २०२५ च्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सुरुवातीला ही जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये प्रकाशित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मार्च महिना संपत आला तरी ती न आल्यामुळे राज्यभरातील लाखो स्पर्धा परीक्षेच्या (MPSC Exam) विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली होती. आता आयोगाने जाहिरात जाहीर केली.
या जाहिरातीनुसार, २०२५ मध्ये एकूण ३८५ जागा भरण्यासाठी नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली जाईल. महाराष्ट्र राज्यातील ३७ जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात येईल. यावर्षीपासून राज्यसेवा मुख्य परीक्षा संबंधित वर्णनात्मक पद्धतीनुसार होणार असल्याने विद्यार्थी नवी तयारी करत आहेत.
जाहिरातीनुसार, अर्ज प्रक्रिया २८ मार्चपासून सुरू होईल आणि १७ एप्रिल २०२५ पर्यंत चालेल. अर्जदारांनी ऑनलाइन शुल्क १७ एप्रिलपर्यंत भरावे लागेल, तर चालनद्वारे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २१ एप्रिल २०२५ आहे. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना काही विभागानुसार पदांच्या वितरणाची माहिती मिळाली आहे:
- सामान्य प्रशासन विभाग – राज्यसेवा: १२७ जागा
- महसूल व वन विभाग – महाराष्ट्र वनसेवा: १४४ जागा
- सार्वजनिक बांधकाम विभाग – स्थापत्य अभियांत्रिकी सेवा: ११४ जागा
पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे लक्ष नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रावर आहे, कारण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ते प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य असते. अनेक विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र ३१ मार्च २०२५ रोजी संपत आहे, त्यामुळे त्याआधी जाहिरात निघावी, अशी त्यांची मागणी होती. आयोगाच्या या विलंबामुळे विद्यार्थ्यांची मनःस्थिती गोंधळलेली होती, परंतु आता परीक्षा आणि अर्ज प्रक्रियेची अधिकृत माहिती जाहीर झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळालेला आहे.
हेही वाचा:
• कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत सुधारणा
• जामखेडचा नवीन आराखडा तयार करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश