Farmer ID | अहिल्यानगर जिल्हा शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र देण्यासाठी सुरू केलेल्या अॅग्रीस्टॅक योजनेत राज्यात पहिल्या स्थानावर आहे. या योजनेत आतापर्यंत ५ लाख १८ हजार ५८१ शेतकऱ्यांची (Farmer ID) नोंदणी झाली आहे, ज्यामुळे जिल्हा प्रशासनाने या योजनेसाठी राज्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अॅग्रीस्टॅक योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या नोंदणीचे (Farmer ID Registration) उद्दिष्ट १५ लाख २२ हजार ५८१ शेतकऱ्यांचे ठेवले आहे.
केंद्र आणि राज्य सरकार विविध शेतकरी योजनांसाठी ओळखपत्रांच्या सुविधेची अंमलबजावणी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा अधिक प्रभावी लाभ मिळवता येईल. योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या माहितीचा गोंधळ कमी करणे आणि त्यांना विविध सरकारी योजना अचूकपणे लागू करणे.
फार्मर आयडी कार्डसाठी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे म्हणून आधार कार्ड, सात बारा उतारा, गट क्रमांक, नमुना ८ अ खाते उतारा आणि मोबाईल नंबर आवश्यक आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क वसुली केली जात नाही, आणि पैशाची मागणी केल्यास संबंधित अधिकारी यावर कारवाई करणार आहेत.
शेतीशी संबंधित विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. यामध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, कृषी विभागाचे यांत्रिकीकरण, थेट लाभ हस्तांतरण आणि पीक कर्ज या योजनांचा समावेश आहे.
जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये नोंदणीचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे:
श्रीगोंदा ४४,६८५, नगर ३४,९२२, संगमनेर ५१,६६१, जामखेड २६,७११, कर्जत ३८,१०२, पाथर्डी ३८,९१८, राहुरी ३८,८५८, नेवासा ५३,०८६, शेवगाव ३८,८४८, कोपरगाव २६,७८६, पारनेर ४४,८९५, अकोले ३२,३७३, राहाता २६,०२९ आणि श्रीरामपूर २२,७०७ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा अधिक सुलभ आणि वेळेवर लाभ मिळवता येईल.
हेही वाचा:
• जामखेड पंचायत समितीमध्ये 126 पदे रिक्त; प्रशासनावर अतिरिक्त ताण, नागरिकांकडून पदे भरण्याची मागणी