Jamkhed Bajar Samiti | राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का देत बाजार समितीचे संचालक राहुल बेदमुथा यांनी शरद पवार गटाची सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे जामखेड बाजार समितीत (Jamkhed Bajar Samiti) आमदार पवार गटाची सत्ता समाप्त झाली असून, भाजप गटाला यामुळे बहुमत मिळालं आहे.
यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कारले, संचालक अंकुश ढवळे, संचालक सचिन घुमरे आणि माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सोमनाथ पाचरणे या महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांपैकी शरद पवार गट आणि प्रा. राम शिंदे गटाला समान जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सत्तास्थापनेच्या वेळेस पेच निर्माण झाला होता आणि दोन्ही गटांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली होती.
त्यानुसार, शिंदे गटाचे शरद कारले सभापती झाले होते, तर पवार गटाचे कैलास वराट उपसभापती म्हणून निवडले गेले होते. यानंतर समितीत दोन्ही गटांचे संख्याबळ समान असल्याने कार्यकाळ दरम्यान अनेक अडचणी निर्माण होत्या. निर्णय घेण्यात अनेक वेळा गोंधळ झाला आणि काही निर्णय माघारी घेतले गेले. 9-9 संचालक असल्यानं कारभार करताना सभापती कारले यांना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागली.
आता, राहुल बेदमुथा भाजपमध्ये सामील झाल्यामुळे भाजप गटाला जामखेड बाजार समितीत बहुमत प्राप्त झाले आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आमदार पवार गटाला या घटनाक्रमामुळे धक्का बसला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा:
• बजेटपूर्वी बँकांबाबत महत्त्वाची घोषणा! 5 दिवसांचा आठवडा, कामाच्या वेळेत बदल होण्याची शक्यता
• जामखेडमध्ये आरटीआय कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी; बेकायदा कलाकेंद्र बंद केल्यामुळे गुन्हा दाखल