MPSC | सौ. रुपाली दिपक शेळके-शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी निवड झाली. अधिकारी (MPSC) होण्याची इच्छा आणि त्यासाठी कष्ट करण्याच्या जिद्द आणि त्यात त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहून सर्वोत्कृष्ट नवरा बनून आपल्या अर्धांगिनीच्या कष्टाला स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून यशाच्या शिखरापर्यंत पोहचवण्याचा मार्ग तयार करू शकतो हे दिपक यांनी जगाला दाखवून दिले.
प्रत्येकजण लहानपणी आपल्याला मोठे झाल्यावर काय व्हायचं आहे, ते स्वप्न पाहतो. पण ते यशाचे शिखर गाठण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागतात. जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. तसेच सौ. रुपाली दीपक शेळके-शिंदे यांचे लहानपणापासून पाहिलेले स्वप्न साकार झाले आहे. रुपाली दीपक शेळके-शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा उत्तीर्ण करून महसूल सहाय्यक पदावर निवड मिळवली आहे. त्यांचे हे यश केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबासाठीही एक अभिमानाचा क्षण ठरला आहे. अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमांचा पुरस्कार आज त्यांना मिळालेला आहे.
रुपाली यांचे शालेय शिक्षण जि.प. प्राथमिक व माध्यमिक शाळा सौताडा येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाचा उत्साह होता आणि अभ्यासामध्ये एक वेगळीच आवड निर्माण झाली होती. सातवीनंतरच त्या आधीच ठरवून बसल्या होत्या की त्यांना चांगली कारकीर्द घडवायची आहे. शालेय जीवनात त्यांना ‘सुनीता जिल्हाधिकारी झाले’ या धड्यातून सरकारी अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली.

बारावीनंतर त्यांचे लग्न झाले आणि लग्नानंतर शिक्षणाचा मार्ग सोडणार नाही असे ठरवले. त्यांच्या सासरच्या कुटुंबाने त्यांना पूर्ण सहकार्य दिले आणि त्यांनी आपले B.Sc. (Chemistry) पदवी दादा पाटील महाविद्यालय जामखेड कर्जत येथून पूर्ण केली. शिक्षणाच्या दरम्यान त्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करायचा होता, म्हणूनच त्यांनी पुण्यात जाऊन एक वर्ष अभ्यास केला.
ग्रॅज्युएशननंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सुरू केली, परंतु कोविडच्या काळात दोन वर्षे अभ्यासाचे खंड पडले. तरीही त्यांनी हार मानली नाही. 2021 मध्ये, त्यांनी महाराष्ट्र गट-‘क’ आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली, परंतु मुख्य परीक्षा काही कारणांमुळे लांब पडली. त्यानंतर, त्यांना थोडी निराशा झाली होती. पण, सासर-माहेरच्या सर्वांच्या साथ आणि पतीच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि या वेळी त्यांची यशस्वी होऊन महसूल सहाय्यक पदावर निवड झाली.
रुपाली दीपक शेळके-शिंदे यांच्या यशामध्ये केवळ त्यांच्या मेहनतीचा नाही, तर त्यांच्या कुटुंबाच्या प्रोत्साहनाचा देखील मोठा वाटा आहे. ज्याप्रमाणे एक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे रुपालींच्या यशात त्यांच्या पतीचे आणि दोन्ही कुटुंबाचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे.
हेही वाचा:
• आयएमडीचा रेड अलर्ट! देशात अतिमुसळधार पावसासह आणखी एक मोठं संकट; पुढील 48 तास ठरणार धोक्याचे
• आनंदाची बातमी! शेतकऱ्यांची तलाठ्यांकडील ही ११ कामे होणार झटपट; जाणून घ्या सविस्तर